- अमोल पवार यांचा जिल्हास्तरीय सन्मान
- बावी शाळेची तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी
- दोन लाखांचे बक्षीस शाळेला प्राप्त
- दुसऱ्या टप्प्यात तीन लाख मंजूर
- ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा विकास
- आधुनिक सुविधांनी सुसज्ज झाली शाळा
AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बावी येथील मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांची अहिल्यानगर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या कार्याचा तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावीने जामखेड तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला असून, शाळेला दोन लाख रुपयांचे बक्षीस धनादेश स्वरूपात मिळाले आहे. तसेच, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रमांक दोनमध्ये तीन लाख रुपयांचे बक्षीस मंजूर झाले आहे.
शासकीय समितीमार्फत पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा आणि गुणवत्ता या तीन निकषांवर शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. सर्व शाळांच्या सहभागातून बावी शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली. हळगाव केंद्रामध्येही शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.मुख्याध्यापक अमोल पवार यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, दानशूर ग्रामस्थ, विविध संस्था तसेच आजी-माजी शिक्षकांच्या परिश्रमांना दिले आहे.
शाळेत सुसज्ज इमारत, संरक्षण भिंत, वनराई, शालेय बाग व परसबाग, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर सिस्टीम, हँडवॉश स्टेशन, भव्य क्रीडांगण, धूरमुक्त पोषण आहार, आकर्षक रंगरंगोटी, संगणक, इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आणि इन्व्हर्टरसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळेही शाळेचा दर्जा टिकून असल्याचे सांगण्यात आले.
एनटीव्ही न्यूज मराठी | जामखेड
