पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरेश भट सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेला मनपाच्या शाळांसह विविध खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर वाढावा आणि लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मनपाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने माती मळून, त्याला आकार देत कल्पकतेने विविध प्रकारच्या गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे कौशल्य मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्वही समजले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गणेश टेकडी गणपती, विदर्भाचा राजा, नागपूरचा राजा यांसह विविध स्वरूपातील गणेशमूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या हजारो गणेशमूर्तींमध्ये त्यांच्या कलात्मकतेची आणि सर्जनशीलतेची झलक पाहायला मिळाली.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आपल्या हाताने तयार केलेली गणेशमूर्ती घडविताना विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार गणेशमूर्तींना वेगवेगळे आकार आणि रूप दिले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात गणेशभक्तीबरोबरच ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या संकल्पनेचा संदेश पोहोचला.
कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती विद्यार्थी आपल्या घरी घेऊन जाणार असून, गणेशोत्सवादरम्यान त्यांची विधिवत पूजा केली जाणार आहे. त्यानंतर या शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांमध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमातून ‘गणेशोत्सव साजरा करा, मात्र पर्यावरणाची काळजी घेऊन’ असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याचा मनपाचा प्रयत्न राहणार आहे.
