• सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहाचा सन्मान
  • ‘हत्तीची सहल’ला उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार
  • एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
  • पत्रकार भवनात पुरस्कार सोहळा संपन्न
  • निवड समितीकडून एकमताने काव्यसंग्रहाची निवड
  • शिक्षण-साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

PUNE | पुण्यातील शिक्षक संजीवनी मासिकातर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी पुरस्कार दिले जातात. यावर्षी बालसाहित्य विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार पिंपळे जगताप, ता. शिरूर येथील सचिन बेंडभर यांच्या ‘हत्तीची सहल’ या बालकाव्यसंग्रहाला प्रदान करण्यात आला.

संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘हत्तीची सहल’ या बालकाव्यसंग्रहाला प्रसिद्ध कवी आणि साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते पुणे येथील पत्रकार भवनात सकाळी १० वाजता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक दिलीप फलटणकर, स्वाती महालंक, माधुरी गोखले, भालचंद्र कुलकर्णी, अविनाश सकुंडे, दिलीप गरुड, श्रुती कुलकर्णी, संपादक देविदास लिमजे आणि कार्यकारी संपादक डॉ. संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहाला २०२६ सालचा हा पहिलाच सन्मान असून निवड समितीने एकमताने या काव्यसंग्रहाची निवड केली आहे. ‘हत्तीची सहल’मध्ये लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक तसेच त्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बालचमूंसाठी संस्काराची शिदोरी म्हणून या काव्यसंग्रहाकडे पाहिले जात आहे.
संस्कृती प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार प्रतीक काटे यांनी विषयाला अनुरूप चित्रे आणि आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिका संगीता बर्वे यांनी पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली असून बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *