- ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी एशियाटिक सोसायटीला आवाहन
- ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करण्यावर अमित शाहांचा भर
- रमेश दंडवते यांची ५० लाखांची मदत
- दुर्मीळ पांडुलिपींसाठी विशेष अभियान राबवण्याचे आवाहन
- ‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
- १,३०० ऐतिहासिक दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन
भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते.
एशियाटिक सोसायटीकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून हा ज्ञानसंग्रह देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे अमित शाह यांनी सांगितले. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश दंडवते यांनी एशियाटिक सोसायटीच्या बळकटीकरणासाठी ५० लाख रुपयांची मदत केली. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आदी उपस्थित होते.
राष्ट्राची स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा, अभिलेख आणि परंपरांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे पुनर्मूल्यांकन भारतीय दृष्टिकोनातून होणे आवश्यक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे, ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करणे आणि देशातील ग्रंथालये व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत आणि विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन व संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. इतिहास हा केवळ भूतकाळ समजून घेण्याचे साधन नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याचा वेग निश्चित करणारा महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. मानवतेचा प्रवास, विचारांची जडणघडण, अभ्यासपद्धती आणि विविध शास्त्रांची उत्क्रांती यांचे दस्तऐवजीकरण होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परकीय आक्रमणांमध्ये नालंदा विद्यापीठाची मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली ग्रंथसंपदा आणि त्यासंदर्भातील घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एशियाटिक सोसायटीचा २२२ वर्षांचा गौरवशाली वारसा असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथ, पांडुलिपी व नाणी यांचे जतन भावी पिढ्यांसाठी आवश्यक असून, या वारशाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे नमूद केले. एशियाटिक सोसायटीच्या समृद्ध ग्रंथसंपदा आणि ऐतिहासिक वारशातून ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.
‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे ‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली.
प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे १,३०० दुर्मीळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा १७८८ मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा १८७० मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे.
भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मीळ ऐतिहासिक ग्रंथही येथे प्रदर्शित करण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन या प्रदर्शनातून घडले.
एनटीव्ही न्यूज मराठी | मुंबई
