महाराष्ट्र शासनाच्या श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत मनवेल येथे गणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले.
मनवेल येथील महर्षी वाल्मिकी गणेश मित्र मंडळाच्या प्रांगणात साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरसाड उपकेंद्राच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, डीपीएम डॉ. पंकज शिंपी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या सूचनेनुसार, तसेच साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मुकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मा परविन नमुउदीन शेख यांनी गणेशभक्तांची आरोग्य तपासणी केली.
शिबिरात बीपी, शुगर, रक्त तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरासाठी आरोग्य सहाय्यक राजू तडवी, अधिपरिचारिका वृषाली पाटील, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, सरदार कनाशा तसेच आशा स्वयंसेविका रंजना कोळी, पूनम पाटील आणि ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.
