यावल शहरासह तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. शहरातील २१ मंडळांच्या मिरवणुका जल्लोषात पार पडल्या, तर संपूर्ण विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.
जळगाव जिल्ह्यातील यावल शहर व तालुक्यातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, महेलखेडी आणि सावखेडासिम या गावांमध्ये पाच दिवसांच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
यावल शहरातील २१ मंडळांच्या वतीने शुक्रवारी वाद्यवृंदाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. शहरातील मेन रोडवरून निघालेल्या मिरवणुका रात्री १२ वाजेच्या निर्धारित वेळेत नगरपालिकेजवळील रेणुका माता मंदिरापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर भुसावळ रस्त्यावरील हतनूर कालवा तसेच तापी नदीपात्रात श्रींचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद, अनिल महाजन, एम.जे. शेख यांच्यासह सहायक फौजदार, हवालदार आणि होमगार्ड अशा शेकडो पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात होता.
शहरातील काझी मशीदजवळ शांतता समितीच्या सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांकडून विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण भागातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी आणि सावखेडासिम या गावांतही पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
