अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गोमांस वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वाशीम बायपासवर नाकाबंदी करून बोलेरो वाहनातून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार वाशीम बायपास येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून पातूर ते अकोला अवैधरीत्या गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन क्रमांक MH30AA1999 संशयितरित्या येताना दिसले. तपासणी केली असता वाहनात अब्दुल कलीम अब्दुल कदीर, अब्दुल आदिल अब्दुल आवेज, आमिर खान जुबेर खान आणि सरदार खान कासम खान हे चौघे आढळून आले.
त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन, 80 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आणि अंदाजे 30 हजार रुपये किमतीचे एक क्विंटल गोमांस, असा एकूण 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील, एसआय राधेश्याम पटेल, हेड कॉन्स्टेबल मनोजसिंग ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाचपिल्ले, योगेश चौधरी, विकास गोलोकार, रिषभ शर्मा व इतर सहकाऱ्यांनी केली.
