यावल शहरात वाल्मीकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेवजी महाराज यांची ६७४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पद्मालय हॉल येथून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुंदन फेगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर आप्पा सोनवणे, सुनील पवार, पल्लाजी घारू, नंदाताई महाजन, नगरसेवक उमेश फेगडे, बाळासाहेब फेगडे, दिल रुबाब तडवी, पी. एस. सोनवणे सर, वस्ताद रूपचंदजी घारू, मुकेश येवले, डॉ. निलेश गडे, मुकेश कोळी, अतुल चौधरी, संजय भोई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीरामनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आखाड्यातील कलाकारांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. सुमारे ६५ वर्षांपूर्वी वस्ताद रूपचंदजी घारू यांनी स्थापन केलेला हा आखाडा कालांतराने बंद पडला होता. मात्र, पुन्हा आखाडा सुरू करून तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे.
गेल्या ६५ वर्षांपासून आखाड्याची परंपरा जपणाऱ्या वस्ताद रूपचंद घारू यांचा प्रभाकर आप्पा सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रात्री सुमारे १० वाजता रामदेव बाबा मंदिरात आरतीने मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी यावल नगरपालिकेचे शिक्षण सभापती पराग सराफ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती उत्सव व मिरवणूक यशस्वी करण्यासाठी यावल शहरातील समस्त मेहतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. एस. सोनवणे सर यांनी केले.
