यावल तालुक्यातील सावखेडासिम शिवारात कांदा लागवड केलेल्या रोपांच्या नुकसानीवरून वाद झाला आहे. कांदा पिकावरून झालेल्या वादात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, एकूण सहा जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिगाव येथील कडू चंदू जयकर यांचे सावखेडासिम शिवारातील गट नंबर १५४ मध्ये कांदा रोपांची लागवड केलेली आहे. या रोपांमधून आयशर ट्रक चालवून पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी फिर्यादी प्रकाश सुभाष पाटील हे दिनांक २१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील केळी पीक कापणीसाठी आयशर ट्रक घेऊन गेले होते.

याबाबत विचारणा केली असता आरोपी कडू चंदू जयकर यास आयशर ट्रक चालवून पिकाचे नुकसान केल्याचा संशय आला. या संशयावरून त्याने फिर्यादीस चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक दोन पंकज कडू जयकर याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने मारून दुखापत केली.

याबाबत प्रकाश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत आरोपी कडू चंदू जयकर, पंकज कडू जयकर, परेश मधुकर तायडे आणि आशाबाई चिंदू जयकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर याच बाबत आशाबाई चिंदू जयकर, रा. दहिगाव, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सावखेडासिम शिवारातील गट नंबर १५४ मध्ये कांदा रोपांची लागवड केलेली आहे. या रोपांवरून आरोपी प्रकाश सुभाष पाटील व विजय विकास पाटील, रा. सावखेडासिम, हे केळी भरण्यासाठी आयशर ट्रक कांदा रोपांवरून चालवीत पिकाचे नुकसान केले आहे.

याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या हाताच्या कोपऱ्यावर लाकडी काठीने मारून दुखापत केली, अशी फिर्याद देण्यात आली.

या फिर्यादीवरून प्रकाश पाटील व विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *