यावल नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये मंजूर झालेल्या विकासकामांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून विविध कामांना मंजुरी मिळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूर विकासकामांची एकत्रित किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. यामध्ये सातोद रोडवरील परिसरात पाण्याची टाकी उभारणे — २ कोटी २९ लाख रुपये, पंडितनगर येथे डांबरीकरण — १५ लाख रुपये, कृष्ण तारानगर भागात डांबरीकरण रस्ता व गटार — ६० लाख रुपये, बालाजी सिटी परिसरात रस्ता व गटार — २५ लाख रुपये, बाबा नगर भागात गटार बांधकाम — ४० लाख रुपये, खिन्नीपुरा येथे गटार बांधकाम — २० लाख रुपये, बारी वाड्यात संत रूपलाल महाराज प्रवेशद्वार — ८ लाख रुपये, तसेच साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्वेकडील नवीन प्रवेशद्वार — १० लाख रुपये, साने गुरुजी विद्यालयात व्यायामशाळेसाठी ओपन जिम — ११ लाख रुपये आणि साने गुरुजी विद्यालयाचे रंगकाम — २० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम ही नागरिकांची पूर्वीपासूनची मागणी होती. मंजूर कामांमध्ये या कामाचा समावेश झाल्याने संबंधित मागणी आता मार्गी लागणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
तसेच फैजपूर–चोपडा रस्त्यावरील डिव्हायडरचे सुशोभीकरण — १० लाख रुपये, शहरात शेतकरी दांपत्याचे शिल्प उभारणे — ८ लाख रुपये, अक्सा नगर भागात डांबरीकरण — ८० लाख रुपये, वाणी गल्लीतील गटार बांधकाम — २० लाख रुपये, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पाच वेगवेगळ्या ठिकाणी शौचालय व मुतारी बांधकाम — ९५ लाख रुपये, पांडुरंग सराफ नगरातील डांबरीकरण व गटार बांधकाम — २५ लाख रुपये, दगडूशेठ सोनार ते डॉक्टर देशमुख यांच्या घराजवळ गटार बांधकाम — १० लाख रुपये आणि मदिना नगर भागात रस्ता-गटार बांधकाम — ६० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
शहरात विविध तीन ठिकाणी वॉटर एटीएम बसवणे — १० लाख रुपये, शहरात इनडोअर जिम — १५ लाख रुपये, यावल शहरात वृक्षारोपण — ५ लाख रुपये आणि कलाकार कट्टा तयार करणे — ५ लाख रुपये, या कामांचाही समावेश आहे.
तसेच शहरातील कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावल शहरातील व तालुक्यातील नागरिकांसाठी शववाहिनी तसेच शहरातील नागरिकांसाठी शवरथासाठी सुमारे ४० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कामे मंजूर होण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, सर्व सहकारी नगरसेवक तसेच नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांचे सहकार्य आणि प्रशासकीय समन्वय राहिला आहे.
या विकासकामांसाठी निधी व प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी, जळगाव, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नगराध्यक्षांनी आभार मानले.
“निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार शहरातील आवश्यक विकासकामांना प्राधान्य देऊन त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून, उर्वरित आवश्यक कामांसाठीही पाठपुरावा सुरू राहील,” असे नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी सांगितले.
