उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत एटीएम कार्ड एक्सचेंज करून लबाडीने पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय सराईत आरोपीचा उमरखेड पोलिसांनी छडा लावला आहे. मुंबई येथून गुन्ह्यातील 28 हजार रुपयांची 100 टक्के रक्कम जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांच्या दरम्यान फिर्यादी साईनाथ शेषराव शिंदे, वय 50 वर्षे, रा. मोहननगर, उमरखेड हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका इसमाने पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. त्याने फिर्यादी यांच्याकडील एटीएम कार्ड स्वतःकडे घेऊन त्यांना दुसरे एटीएम कार्ड दिले आणि पासवर्ड टाकण्यास सांगितले. त्यानंतर सदर इसम फिर्यादीचे एटीएम कार्ड घेऊन तेथून निघून गेला.
त्यानंतर काही वेळातच फिर्यादीच्या अकाउंटमधून तीन व्यवहारांमध्ये एकूण 28 हजार रुपये काढण्यात आले आणि फिर्यादीच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम शून्य झाली. याप्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 751/2026, कलम 316, 318 भा.न्या. संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आरोपी निष्पन्न करून तात्काळ अटक करणे आणि मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी डी.बी. पथक आणि अधिनस्थ कर्मचाऱ्यांना आरोपीच्या शोधासाठी आदेशित केले.
पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आणि डी.बी. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी सय्यद कमालउद्दीन खान, वय 36 वर्षे, मूळ रा. सगरासुंदरपूर, कालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश, सध्या रा. यादव मिश्रालाल चाळ, यादवनगर, खैरानी रोड, साकीनाका, अंधेरी (पश्चिम), याची ओळख पटवली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आणि त्यांच्या टीमने मुंबई येथे जाऊन आरोपीच्या राहत्या घरी शोध घेतला. यावेळी त्याच्या घरातून गुन्ह्यातील एटीएम एक्सचेंज करून लबाडीने मिळवलेली फिर्यादीची एकूण 28 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे उमरखेड पोलिसांनी सदर गुन्हा कौशल्यपूर्ण पद्धतीने उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड गुरव कायंदेपाटील आणि ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार पंतगे, पोलीस हवालदार संदीप ठाकूर, पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस हवालदार अतुल तागडे, पोलीस कॉन्स्टेबल दिगांबर गिते, पोलीस कॉन्स्टेबल संघशील टेंबरे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू राठोड आणि चापोकॉ रूद्रा, सर्व उमरखेड पोलीस स्टेशन, यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.
