महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे निमोनियामुळे अवघ्या एक वर्षाच्या सिझा फातेमा सय्यद या चिमुकलीचा दि. २२ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ही चिमुकली पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांची मुलगी होती. या घटनेने सय्यद मुदस्सीर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण डोंगरगावात हळहळ व्यक्त होत आहे.
डोंगरगावमध्ये वाढता डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये आधीपासूनच चिंता आहे. अशा परिस्थितीत चिमुकलीचा निमोनियामुळे मृत्यू झाल्याने गावातील प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डासांचा प्रादुर्भाव; फॉगिंग-फवारणीचा अभाव
गावात डासांचा वाढता प्रादुर्भाव असतानाही नियमित फॉगिंग, औषध फवारणी, साचलेल्या पाण्याचा निचरा व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जाते का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आजारांचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत होणे आवश्यक असताना डोंगरगावकडे आरोग्य विभागाचे पुरेसे लक्ष आहे का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
डोंगरगावला आरोग्य उपकेंद्र कधी?
महागाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगरगावला अद्याप स्वतंत्र आरोग्य उपकेंद्राची सुविधा नसल्याने नागरिकांना प्राथमिक उपचार व तपासणीसाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागते. गावातील आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता तातडीने आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मृत्यूची चौकशी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
आपल्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांनी शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांची योग्य ती चौकशी करावी आणि ग्रामीण भागात प्रभावी प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
डोंगरगावमध्ये तातडीने फॉगिंग, औषध फवारणी, स्वच्छता मोहीम व आरोग्य तपासणी शिबिर घेण्याबरोबरच कायमस्वरूपी आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चिमुकलीच्या मृत्यूने अनेक प्रश्न ऐरणीवर
सिझा फातेमा सय्यद या एक वर्षाच्या चिमुकलीचा निमोनियामुळे झालेला मृत्यू ही डोंगरगावसाठी वेदनादायी घटना ठरली आहे. या घटनेनंतर गावातील डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांचा अभाव हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. प्रशासन आता तरी तातडीने दखल घेणार का?
