लातूर तालुक्यातील मुरुड बु. येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुरुड बु., चिंचोली बु. आणि तांदुळजा परिसरातील नागरिकांना महसुली सेवा नजीक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासकीय कामकाजाचा वाढता व्याप, अपुरा अधिकारी-कर्मचारी वर्ग, तालुक्याचे भौगोलिक स्थान, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेऊन प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी मुरुड बु. येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार तहसील कार्यालय लातूर अंतर्गत लातूर, कन्हेरी, हरंगुळ बु., गातेगाव, बाभळगाव आणि कासारखेडा अशी ६ महसूल मंडळे राहतील. तर अपर तहसीलदार कार्यालय मुरुड बु. अंतर्गत मुरुड बु., चिंचोली बु. आणि तांदुळजा अशी ३ महसूल मंडळे राहतील.

अपर तहसीलदार मुरुड बु. यांचे प्रतिवेदन अधिकारी संबंधित उपविभागीय अधिकारी, तर नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी लातूर काम पाहतील. अपर तहसीलदारांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.

नवीन कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार संबंधित क्षेत्रातील अधिकार वापरण्यात येतील. निवडणूक, संजय गांधी निराधार योजना आणि इतर अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात येतील.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयाची जागा निश्चित करून, कायमस्वरूपी जागा शोधून बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश आहेत. या सर्व बाबींची पूर्तता करून १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा, त्यानंतर प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत कळवण्यात येणार आहे.

मुरुडला स्वतंत्र तालुका करण्याच्या दिशेने ही पहिली अधिकृत पायरी असल्याचे सांगण्यात येत आहे. लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्णत्वाकडे जात असल्याचेही या निमित्ताने सांगण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल आ. कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *