यावल शहरातील ग्लोबल हायस्कूलसमोर आणि व्यासनगर परिसरात पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेले मोठे खड्डे उघडेच असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळेसमोर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने दुर्घटना घडण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
यावल नगरपरिषद हद्दीतील व्यासनगरच्या कोपऱ्यावर, झांबरे सरांच्या घराजवळ गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा पाईपलाईनच्या व्हॉल्व्हचे काम सुरू आहे. काम संथ गतीने सुरू असल्याने मोठा खड्डा उघडाच असून रात्रीच्या अंधारात वाहनचालक किंवा पादचारी खड्ड्यात पडून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्लोबल हायस्कूलसमोरही मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची दररोज मोठी वर्दळ असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यास खड्डे तातडीने बुजवून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची दखल घ्यावी आणि व्यासनगर कोपरा तसेच ग्लोबल हायस्कूलसमोरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
