जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील गौसिया नगर भागात यावल पोलिसांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे साडेतीनशे किलो गोमांस आणि दोन जिवंत गोवंश जप्त केल्याची माहिती आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे यांनी सापळा रचला.
२८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास किनगाव येथील गौसिया नगर भागात पोलिसांनी कारवाई केली. रशीद बशीर कुरेशी यांच्या घरामागील बंदिस्त जागेत दोन जिवंत गोवंश बांधून ठेवलेले आढळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच गोमांस विक्री होत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणात समीर सलीम कुरेशी आणि इम्तियाज खलील कुरेशी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे, सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलीस हवालदार रोहील गणेश, पोलीस शिपाई सचिन पाटील, नितेश बागुल आणि अनिल साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
