जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शिरागड येथील श्री सप्तशृंगी माता गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने थोरगव्हाण ते शिरागड या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पथराडे व शिरागड परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
शिरागड येथे निवासिनी श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर असल्याने नवरात्रोत्सवात साकळी, मनवेल, थोरगव्हाण तसेच परिसरातील गावांमधून हजारो भाविक दर्शनासाठी या मार्गाने ये-जा करतात. मात्र, सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढली आहेत.
वाहनांना साईड देताना अडचणी येत असून नवरात्रोत्सवात वाढणाऱ्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्री भाविकांची ये-जा वाढत असल्याने रस्त्याची सुरक्षितता महत्त्वाची ठरणार आहे.
त्यामुळे नवरात्रोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, साईड पट्ट्यांची दुरुस्ती करणे आणि दोन्ही बाजूंची काटेरी झुडपे हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी पथराडे व शिरागड ग्रामस्थांनी केली आहे.
