पुण्यातील आळंदी येथील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील आळंदी परिसरातील कॉलेजचे काही विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्राचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात वाहून गेले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच दिवेआगर येथील ‘भाऊ मारुती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्स’चे मालक भाऊ साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोधमोहीम राबवली. आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे पोलीस टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले आहे.
या दुर्दैवी घटनेची नोंद दिघी सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन पर्यटनाच्या काळात घडलेल्या या दुःखद घटनेने दिवेआगर आणि परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | रायगड
#NTVNewsMarathi #Raigad #Diveagar #PuneNews #Alหนदी #DiveagarBeach #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #Pune #RaigadNews #NewsUpdate #Maharashtra #NTVNews
