♦️ यावल नगरपरिषदेत भव्य आरोग्य तपासणी शिबिर
♦️ सफाई मित्रांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य
♦️ नगराध्यक्षा छायाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
♦️ तज्ज्ञ डॉक्टरांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
♦️ आरोग्यविषयक मार्गदर्शनासह वैद्यकीय सल्ला देण्यात आला
♦️ निरोगी कर्मचारी-सक्षम प्रशासनाचा दिला संदेश
JALGAON | यावल नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्यासाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, आसाराम नगर आणि यावल नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सेवा पंधरवाडा’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानाच्या अनुषंगाने ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिराला नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी नगराध्यक्षा छायाताई पाटील यांनी निरोगी कर्मचारी हे सक्षम प्रशासनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सफाई मित्रांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी या आरोग्य उपक्रमाचे कौतुक करत सफाई मित्रांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आसाराम नगर येथील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल चौधरी, डॉ. स्वाती कवडीवाले आणि डॉ. इंगळे यांनी अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्रांची आरोग्य तपासणी केली. यावेळी आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. शिबिराच्या आयोजनासाठी विजू पाटील आणि मितेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला शिक्षण सभापती पराग सराफ, गटनेते सागर कुमार चौधरी, नगरसेवक निसार शेख, समाजसेवक उमर कच्ची, करीम मण्यार, निलेश बारी यांच्यासह यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
तसेच पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, बांधकाम अभियंता संग्राम शेळके, कर निरीक्षक संभाजी कोल्हे, आस्थापना प्रमुख अनिकेत कर्डिले यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरातून ‘निरोगी कर्मचारी – सक्षम प्रशासन – निरोगी समाज’ हा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच यावल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
