नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील अण्णामोड परिसरातील देशी दारूचे दुकान हटविणे आणि राखेच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सावनेरचे माजी उपसभापती तथा काँग्रेस नेते राहुल तिवारी यांनी २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. माजी मंत्री सुनील केदार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
अण्णामोड परिसरातील गिरीश मोतीलाल जयस्वाल यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाणारे देशी दारूचे दुकान शासनाच्या कॅनल रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आल्याचा आरोप आहे. हे दुकान तातडीने हटविण्याची मागणी राहुल तिवारी यांनी केली आहे.
दारूच्या दुकानाजवळ बसथांबा असल्याने महिला, मुली आणि विद्यार्थिनींना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे तिवारी यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत पोटा-चनकापूरकडून अनेकदा पत्रव्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली.
खापरखेडा वीज केंद्राच्या डी-पॉईंटवरून राख घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून अण्णामोड ते चनकापूर-सिल्लेवाडा मार्गावर राख सांडत असल्याने प्रदूषण होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापूर्वी आंदोलने करूनही तात्पुरत्या उपाययोजनांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी करण्यात आली आहे.
उपोषणस्थळी माजी मंत्री सुनील केदार यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आणि राज्य सरकारवर टीका केली. आंदोलनाच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यात अडचणी येत असल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.
राहुल तिवारी यांनी जलप्राशन करून अन्नत्यागाचे बेमुदत उपोषण सुरू केले असून, संबंधित प्रशासन या दोन्ही मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
