दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असताना अनावश्यक कागदपत्रांची अट घालून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी गंभीर दखल घेतली. बामनोद आणि फैजपूर येथील तलाठी व सर्कल कार्यालयांना अचानक भेट देत त्यांनी पंचनाम्याच्या प्रक्रियेची पाहणी केली.

आमदार अमोल जावळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना विनाकारण कागदपत्रांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

पंचनाम्यासाठी आवश्यक असलेले आधारकार्ड, डीबीटीद्वारे मदत जमा करण्यासाठी आवश्यक बँक खाते तपशील आणि ॲग्रीस्टॅकशी संबंधित माहिती घ्यावी. मात्र, आवश्यकता नसताना ७/१२ उतारा, ८-अ यांसारख्या कागदपत्रांची मागणी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

“दुष्काळामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. कागदपत्रांच्या नावाखाली त्याची अडवणूक करू नका आणि त्याला कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावू नका. आवश्यक माहिती घेऊन पंचनामे वेळेत पूर्ण करा,” अशा स्पष्ट शब्दांत आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी त्यांनी कार्यालयीन कामकाज तसेच दुष्काळ पंचनाम्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. रावेर-यावल मतदारसंघातील सर्व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कार्यालयांनी याच पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अनावश्यक कागदपत्रांबाबत निर्माण झालेल्या या प्रकाराची आमदार जावळे यांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील तत्काळ आदेश मागे घेतले. त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांच्या अटीपासून दिलासा मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी पंचनामे पारदर्शक, सुलभ आणि विनाविलंब पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही आमदार जावळे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *