जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील राजोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘श्रमसृष्टी मुक्ताई परसबाग (गुरुकिल्ली आरोग्याची)’ या नामफलकाचे थाटात अनावरण करण्यात आले. विश्व शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील शिक्षकांचा गौरवही करण्यात आला.

‘रोपू झाडे, फुलवू जीवन’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत ५ ऑक्टोबर रोजी नामफलकाचे अनावरण पंचायत समिती यावलच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, अंजाळे केंद्र समन्वयक तुषार सोनवणे आणि राजोरे ग्राम विस्तार अधिकारी सूरज सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गांची पाहणी करताना इयत्ता पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थिनीने पुष्प देऊन अधिकाऱ्यांचे आपुलकीने स्वागत केले. यावेळी डॉ. गायकवाड यांनी मुख्याध्यापक रवींद्र पाटील व उपशिक्षिका वैशाली पाटील यांच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्याचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.

गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी शिक्षकांनी लोकसहभाग आणि देणग्यांच्या माध्यमातून शाळेचा कायापालट केल्याचे सांगत कौतुक केले. यानंतर डॉ. गायकवाड यांनी परसबागेची सखोल पाहणी केली. बागेतील रोपे, फलकांवरील मजकूर आणि भाजीपाल्याची पाहणी करत त्यांनी समाधान व्यक्त केले. भेंडी, गवार व वांगी स्वतः हाताने तोडताना त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

परसबाग अधिक समृद्ध करण्यासाठी डॉ. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून आकर्षक वर्गसजावटीची पाहणी केली आणि शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *