♦️ मानवत रुग्णालयाच्या रुग्णवाहिका साईटवर लपवल्या
♦️ शासकीय रुग्णवाहिकेवर मजूर दारू पिताना दिसले
♦️ रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा सवाल
♦️ खाजगी वाहनांकडे रुग्णांना वळवण्याचा संशय
♦️ शासकीय वाहनाच्या गैरवापराचा नागरिकांचा आरोप
♦️ दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
PARBHANI | मानवत ग्रामीण रुग्णालयाच्या निष्काळजी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने दिलेल्या रुग्णवाहिका रुग्णालयात न ठेवता कन्स्ट्रक्शन साईटवर लपवून ठेवल्याचा आरोप असून, याच शासकीय रुग्णवाहिकेवर मजूर दारू पित असल्याचे नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे मानवत ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत हा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एक-दोन नव्हे तर रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात दिसत नसून, शहरातील एका कन्स्ट्रक्शन साईटच्या आडोशाला लपवून ठेवण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे या कन्स्ट्रक्शन साईटवरील मजूर, लेबर लोक दिवसा-ढवळ्या याच शासकीय रुग्णवाहिकेवर बसून दारू पित असल्याचे चित्र नागरिकांनी पाहिले आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ नागरिकांकडे असल्याचे बोलले जात आहे.
एखाद्या गंभीर रुग्णाला तातडीने रुग्णवाहिकेची गरज लागली तर त्याच्या जीवाचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, या गाड्या जाणीवपूर्वक लपवल्या जातात, जेणेकरून रुग्णांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागेल. यामागे मोठे अर्थकारण आहे का, असाही सवाल नागरिक विचारत आहेत.
कन्स्ट्रक्शन साईटवर दारू पिण्यासाठी शासकीय वाहनाचा वापर करणे हा शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि शासकीय नियमांचे उल्लंघन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी परभणी यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मानवत तालुक्यातील सुजाण नागरिकांमधून होत आहे. तसेच या रुग्णवाहिका तात्काळ रुग्णालयात आणून रुग्णसेवेत रुजू कराव्यात, अशीही मागणी आहे.
या प्रकारामुळे मानवतमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भैय्यासाहेब गायकवाड | एनटीव्ही न्यूज मराठी | मानवत, परभणी
