अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १६१ गावांमधील ९६१ वाड्या-वस्त्यांना १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तब्बल ३ लाख ३१ हजार २३३ नागरिकांना दिलासा मिळत आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ६२ गावांतील ३५१ वाड्या-वस्त्यांना ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यात २७ गावांतील १९९ वाड्या-वस्त्यांसाठी २२ टँकर, तर शेवगाव तालुक्यात २८ गावांतील १६८ वाड्या-वस्त्यांसाठी २० टँकर कार्यरत आहेत.
नगर तालुक्यात १९ गावांतील ९१ वाड्या-वस्त्यांना १९ टँकर, पारनेर तालुक्यात ४ गावांतील ३१ वाड्या-वस्त्यांसाठी ५ टँकर, संगमनेर तालुक्यात ८ गावांतील १६ वाड्या-वस्त्यांसाठी ७ टँकर, नेवासा तालुक्यात २ गावांतील १८ वाड्या-वस्त्यांसाठी २ टँकर आणि जामखेड तालुक्यात ६ गावांतील ७ वाड्या-वस्त्यांसाठी ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात ४ गावांतील ४९ वाड्या-वस्त्यांना ४ टँकरद्वारे, तर नगर परिषद पारनेर क्षेत्रात १ गावातील ३१ वाड्या-वस्त्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी एकूण १६९ टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये ४ शासकीय आणि १६५ खासगी टँकरचा समावेश आहे. उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त भागांतील नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, राज्यात २६५ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले असून, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
