• पोलीस अधिकाऱ्यावर तलवार आणि दगडाने हल्ला
  • दहा महिन्यांपासून आरोपी होता फरार
  • शेख अन्सार शेख इस्त्राईल अखेर जेरबंद
  • उमरखेड डी.बी. पथकाची नांदेड रोडवर कारवाई
  • गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून शोध
  • नागचौक परिसरातील हल्ला प्रकरणात अटक

YAVATMAL | उमरखेड येथे वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर तलवार आणि दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. शेख अन्सार शेख इस्त्राईल (वय ३२, रा. उमरखेड, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, उमरखेड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास उमरखेड येथील नागचौक परिसरात दोन गटांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या उमरखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर काही ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी तलवार आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी झाले.
उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९ व इतर संबंधित कलमांसह भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात यापूर्वी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, शेख अन्सार शेख इस्त्राईल हा घटनेपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. उमरखेड पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीवर लक्ष ठेवून होते.
दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी आरोपी उमरखेड येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने नांदेड रोडवर सापळा रचला. यावेळी शेख अन्सार शेख इस्त्राईल याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

एनटीव्ही न्यूज मराठी | उमरखेड, यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *