नागपुरात ‘जननी’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा

सावळी वाघच्या मंगला ठक यांचे निर्मितीत पदार्पण

‘श्री राधिका’ यांनी लिहिली चित्रपटाची कथा

ज्येष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे सांभाळणार दिग्दर्शन

हिंगणघाट, नागपूर, मुंबईत होणार चित्रीकरण

ब्लॅक लेडी फिल्म्सच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती

WARDHA | विदर्भाच्या मातीतील कलागुणांना रुपेरी पडद्यावर आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावळी वाघ येथील मंगला ठक यांनी ‘जननी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून, नागपुरात या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा उत्साहात पार पडला.

विदर्भातील सामाजिक आशय, प्रेमभावना आणि मनोरंजनाचा सुरेख संगम साधणाऱ्या ‘जननी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या शुभपर्वावर नागपूर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला विदर्भातील अनेक कलाकार उपस्थित होते. मान्यवरांनी चित्रपटाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.


हिंगणघाट तालुक्यातील सावळी वाघ या छोट्याशा गावातून कलाक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मंगला ठक यांचा सिनेसृष्टीत ‘श्री राधिका’ या नावाने परिचय आहे. ग्रामीण भागातील संस्कार, अनुभव आणि कलेची आवड यांच्या बळावर त्यांनी अभिनय, साहित्यलेखन आणि दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. आता ‘जननी’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
‘जननी’ या चित्रपटाची कथा श्री राधिका यांनी लिहिली असून, ज्येष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सामाजिक जाणिवा, नात्यांमधील भावबंध आणि मानवी भावविश्व यांना मनोरंजनाची जोड देत प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी कलाकृती साकारण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न असणार आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत चित्रपट निर्मितीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या मंगला ठक यांचा प्रवास नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. सावळी वाघसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेली त्यांची कलात्मक वाटचाल आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या या नव्या यशस्वी वाटचालीमुळे हिंगणघाट तालुक्यासह संपूर्ण विदर्भाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
‘जननी’ चित्रपटाचे चित्रीकरण हिंगणघाट, नागपूर आणि मुंबई येथे होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, ब्लॅक लेडी फिल्म्स या बॅनरअंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *