उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद सुरू आहे. आत्मक्लेश आंदोलनादरम्यान नगराध्यक्षांबाबत केलेले वक्तव्य शिवी नसल्याचा दावा भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पत्रकार परिषदेत केला.
उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नितीन भुतडा यांनी आपली भूमिका मांडली. पुतळा उद्यान विकसित करण्यासाठी मंजूर असलेल्या ७० लाख रुपयांच्या निधीला ना हरकत देण्यास कथित दिरंगाई होत असल्याने आपण उद्विग्न होऊन वक्तव्य केले होते. त्यात कोणतीही शिवी किंवा अपशब्द नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष, त्यांचे पती आणि समर्थक नेत्यांनी केलेले आरोपही त्यांनी फेटाळले. यासंदर्भातील काही चित्रफिती त्यांनी पत्रकारांसमोर सादर केल्या.
सन २०२२ मध्ये पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. मंजूर निधी खर्च करण्याची कालमर्यादा असल्याने पुतळा परत जाऊ नये म्हणून तो उमरखेडमध्ये आणल्याचे भुतडा यांनी सांगितले. या प्रक्रियेत आपल्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी नमूद केले. पुतळा आठ फूट खड्ड्यात ठेवण्याची वेळ येऊ नये, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
विद्यमान नगरपरिषद प्रशासनाच्या नऊ महिन्यांच्या कारभारावर टीका करताना त्यांनी शहरात गढूळ पाणी येत असल्याचा आणि चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ आल्याचा आरोप केला. नगरपरिषदेकडून पैशांची उधळपट्टी होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
नगराध्यक्षांशी आपले पारिवारिक संबंध असून, वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे भुतडा यांनी सांगितले. या वक्तव्याचा उद्देश कोणाचाही अवमान करणे नसून, पुतळा उभारणीतील कथित दिरंगाईमुळे संतापातून ते वक्तव्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाणे, माजी आमदार विजय खडसे, बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, खविसचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, नगरसेवक सुरेंद्र कोडगीरवार, भीमराव पाटील चंद्रवंशी, ॲड. अनिल माने, नगरपालिकेचे गटनेते विजय हरडफकर, नगरसेविका वंदना घाडगे आणि ज्योत्स्ना रुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
