सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयात पेन्शनसह विविध कामांसाठी येणाऱ्या निवृत्त शिक्षकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन निवृत्त शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला असून, जिल्हा परिषद गार्डनमध्ये २५ सिमेंट बाकड्यांची व्यवस्था करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शनसह विविध कामांसाठी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयात यावे लागते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यबाहुल्यामुळे विलंब होत असल्याने निवृत्त शिक्षकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते. वयाची ६०, ७० आणि ७५ वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद गार्डनमध्ये बाकड्यांची व्यवस्था करण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे.

यासाठी संघटनेने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

संघटनेच्या वतीने २५ सिमेंट बाकडे बसवून देण्याची तयारी दर्शविण्यात आली असून, त्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी, कार्याध्यक्ष काळप्पा सुतार, बादशहा मुल्ला, रमेश गायकवाड, बाबूराव रायगोडे आणि चन्नमलप्पा चिट्टे आदींनी पुढाकार घेतला आहे.

निवृत्त शिक्षकांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात सेवा दिल्यानंतर वृद्धापकाळात शासकीय कामांसाठी जिल्हा परिषद कार्यालयात यावे लागते. अशा वेळी त्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संघटनेच्या या मागणीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून मंजुरी मिळणार का, याकडे निवृत्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *