यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पंचायत समिती कार्यालयाला आमदार किसनराव वानखेडे यांनी भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
आमदार किसनराव वानखेडे यांनी २९ ऑक्टोबर रोजी उमरखेड पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय, घरकुल विभाग, मनरेगा विभाग, आस्थापना विभाग आणि आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी केली.
संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची माहिती घेतली. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. नागरिकांच्या कामांना प्राधान्य देऊन प्रलंबित कामे अनावश्यक विलंब न करता पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार वानखेडे यांनी दिले.
शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत किंवा विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी करून गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी परमानंद पाटील कदम, अरविंद पाटील धबडगे आणि योगेश वानखेडे उपस्थित होते.
