‘बळीराजा आधार अभियान’अंतर्गत बहुजन हिताय वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद; पाणीबचत, पालकांच्या कष्टांची जाणीव आणि संविधान अभ्यासाचा निर्धार
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचा संकल्प उमरगा येथील विद्यार्थ्यांनी केला आहे. ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बळीराजा आधार अभियान २०२६-२७’ अंतर्गत बहुजन हिताय वसतिगृहात आयोजित संवादातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव आणि जबाबदारीचे भान जपत हा निर्धार व्यक्त केला.
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ऍड. शीतल चव्हाण यांनी दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची जाणीव करून दिली. पाण्याचे महत्त्व, पालकांचे कष्ट, कुटुंबाचे आर्थिक नियोजन आणि विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्यासह पाण्याचा अपव्यय टाळण्याचा, आई-वडिलांकडे पैसे किंवा चैनीच्या वस्तूंसाठी हट्ट न धरण्याचा आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाला हातभार लावण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय संविधानाचा अभ्यास करून त्यातील मूल्ये समजून घेण्याचाही निर्धार विद्यार्थ्यांनी केला.
दुष्काळात सामाजिक संवेदनशीलतेची गरज
दुष्काळाचा सामना करताना केवळ आर्थिक मदत किंवा जलसंधारणाच्या उपाययोजना पुरेशा नाहीत, तर समाजातील प्रत्येक घटकात संवेदनशीलता, विवेकशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, पालकांचे कष्ट आणि उपलब्ध साधनसंपत्ती यांचा विचार करून जबाबदारीने वागले पाहिजे, असे मत ऍड. शीतल चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी बहुजन हिताय वसतिगृहाचे संचालक धम्मचारी प्रज्ञाजीत, मायक्रोकॉम कॉम्प्युटरचे प्रा. युसूफ मुल्ला, प्रा. राजू बटगिरे, किशोर बसगुंडे व विजय चितली आदी उपस्थित होते.
दरम्यान, ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या ‘बळीराजा आधार अभियान २०२६-२७’ अंतर्गत दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार देण्याबरोबरच जलसंधारण, लोकसहभाग आणि सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी आयोजित हा उपक्रमही अभियानाचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे.
सचिन बिद्री | एनटीव्ही न्यूज मराठी | उमरगा, धाराशिव
