कारने येऊन घरफोडी करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील घरफोडीप्रकरणी जालना जिल्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी मंगल संतोष गोरडे, रा. खिलारी वस्ती, टाकळी ढोकेश्वर यांच्या घराचे कुलूप तोडून तीन अज्ञात आरोपींनी ३ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ८४०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अनंत सालगुडे तसेच अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, फुरकान शेख, अभिजीत अरकल आदींच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील कार्तिक प्रकाश आव्हाड याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पथकाने जालना जिल्ह्यात जाऊन कार्तिक प्रकाश आव्हाड, वय २० वर्षे, रा. घनसांगवी, जि. जालना याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली.

त्याच्या माहितीवरून गणेश प्रकाश आव्हाड, वय २० वर्षे, रा. घनसांगवी आणि अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे, वय २१ वर्षे, रा. कळंब, जि. धाराशिव यांनाही ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची कार्यपद्धती अशी होती की, ते डस्टर कार आणि पल्सर मोटारसायकलवरून येऊन घरफोडी करत होते. या प्रकरणातील अर्जुन गायकवाड, पूजा आव्हाड आणि सुमित पांजगे हे फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

  • रेनॉल्ट डस्टर कार – ८ लाख रुपये
  • पल्सर मोटारसायकल – १ लाख रुपये
  • ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने – ८ लाख ४० हजार रुपये

असा एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *