यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी महत्त्वपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली आहे. महायुतीच्या सर्व १९ संचालकांच्या उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील (आमोदा), तर उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी (वड्री) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.

यावल तालुका सहाय्यक निबंधक कुणाल सोनार यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. संस्थेचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले. बैठकीला महायुतीचे सर्व १९ संचालक उपस्थित होते.

सर्वप्रथम मावळते सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक नरोत्तम चौधरी यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्वांना सभापतीपदाची समान संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी राजीनामे दिले होते.

त्यानंतर सभापतीपदासाठी उमेश पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला सर्व संचालकांनी एकमताने अनुमोदन दिले. उपसभापतीपदासाठी पंकज चौधरी यांच्या नावालाही सर्वानुमते संमती मिळाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.

निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, मावळते सभापती उज्जैनसिंग राजपूत, मावळते उपसभापती दीपक चौधरी आणि सर्व संचालकांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी भाजपाचे कार्यकर्ते व मान्यवर हिरालाल चौधरी, विलास चौधरी, लहू पाटील, सलीम तडवी यांच्यासह राकेश फेगडे, दगडू कोळी, हर्षल पाटील, नारायण चौधरी, सागर महाजन, संजय पाटील, कांचन फालक, राखी बन्हाटे, स्विटी बेंडाळे, विलास पाटील, सूर्यभान पाटील, अशोक चौधरी, निलेश गडे आणि सुनील बारी उपस्थित होते.

नूतन सभापती उमेश पाटील यांनी सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि बाजार समितीचा विकास व्हावा, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर बाजार समितीचे कामकाज पारदर्शक पद्धतीने चालवून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचे उपसभापती पंकज चौधरी यांनी सांगितले. आमदार अमोल जावळे यांनी भ्रमणध्वनीवरून नूतन सभापती आणि उपसभापतींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *