दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे. याच भावनेतून राजोरा महावितरण कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावल येथील वृद्धाश्रमात माणुसकीची दिवाळी साजरी केली. त्यांच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

दिवाळी हा सण आनंद, उत्साह आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. मात्र, आपल्या आनंदात समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेण्यातच खऱ्या दिवाळीचे सार सामावले आहे. याच सामाजिक जाणिवेतून राजोरा महावितरण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित आर्थिक योगदान देत यावल येथील यशोदा आई फाउंडेशन संचलित वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देऊन माणुसकीची दिवाळी साजरी केली.

यावेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच दिवाळी फराळाचे वाटप करून दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले.

विशेष म्हणजे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आर्थिक योगदान देत हा उपक्रम राबविला. केवळ शासकीय कर्तव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सेवा, सहकार्य आणि माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.

या सामाजिक उपक्रमात सहाय्यक अभियंता श्री. गौरव बाविस्कर, ऑपरेटर महेंद्र कोळी व श्रीमंत चव्हाण, लाईनमन संजय सूर्यवंशी तसेच लाईन स्टाफ संजीव तडवी, योगेश बाविस्कर, गजानन धुंडाळे, आकाश लोखंडे, चेतन बारी, प्रशांत तायडे, सिद्धेश भंगाळे, चेतक कोळंबे आणि दिगंबर पाटील यांनी सहभाग नोंदविला.

“दिवाळीचा खरा आनंद स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे,” याची प्रचिती राजोरा महावितरण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमातून आली. त्यांच्या या संवेदनशील आणि स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *