जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे स्मशानभूमीच्या बांधकामाचा स्लॅब भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा लाखांच्या शासकीय निधीतून सुरू असलेल्या या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत रवंजे येथे स्मशानभूमीच्या बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, स्लॅब भरल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी तो कोसळला.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, निकृष्ट साहित्याचा वापर आणि बांधकामातील त्रुटींमुळे हा प्रकार घडला. अवघ्या ८ ते १५ दिवसांपूर्वी बांधलेले आडवे बीमही वाकल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून साहित्याची गुणवत्ता तपासावी, ठेकेदारावर कारवाई करावी आणि संपूर्ण बांधकाम नव्याने करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी माजी उपसरपंच जनार्दन कोळी यांनी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर संबंधित ठेकेदार गोपाल भोई यांनी तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे स्लॅब कोसळल्याचे सांगत संपूर्ण बांधकाम नव्याने करून देण्याचे आश्वासन दिले.
