जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मोहराळा-हरिपुरा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. एकोरा नाल्याजवळ भला मोठा पिवळसर रंगाचा वाघ दिसल्याने शेतकरी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावल तालुक्यातील मोहराळा-हरिपुरा रस्त्यावर एकोरा नाल्याजवळ रात्रीच्या सुमारास भला मोठा पिवळसर रंगाचा वाघ दिसल्याची घटना घडली. अचानक वन्यप्राणी समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फैजपूर येथून उपोषणास बसलेले नितीन कोळी आणि पांढरा वस्ती येथील दशरथ भिल हे मोटारसायकलवरून प्रवास करत असताना त्यांना मोठा वाघ दिसल्याचे त्यांनी सांगितले.

हा एकच वाघ नसून परिसरात तीन ते चार वाघ दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वडरी धरणालगत असलेल्या आसरबारी पाडा-वस्तीवरही वाघ आढळून आल्याचे, तसेच नागादेवी परिसरातही वाघ दिसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जाणाऱ्या शेतकऱ्यांनी एकट्याने जाणे टाळावे. तसेच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनीही रात्री या मार्गावरून जाताना सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, वन विभागाने या घटनेची दखल घेऊन एकोरा नाला परिसराची पाहणी करावी, वन्यप्राण्यांच्या वावराची खातरजमा करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन्यप्राण्याबाबतची माहिती वन विभागाला कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *