ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी धोंडे अकॅडमीने पुढाकार घेतला आहे. धानोरा येथील महाविद्यालयात एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग पूर्णपणे मोफत सुरू होणार आहेत.

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धानोरा येथे धोंडे अकॅडमीच्या माध्यमातून बुधवार, ३० डिसेंबर २०२६ पासून मोफत एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या विविध पदांच्या एकूण १६ हजार ७१७ जागांच्या भरतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सूचनेनुसार ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाचे नियोजन मिळावे, हा यामागील उद्देश आहे.

प्रशिक्षणात एमपीएससी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, गुणांचे विभाजन, महत्त्वाचे विषय आणि प्रश्न सोडविण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे शहरात जाऊन प्रशिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम सुरू होत असल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. वाघुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *