मुलीच्या लग्नात मान्यवरांचा सत्कार, हारतुरे आणि इतर खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते गणीभाई तांबोळी यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. विवाह सोहळ्यात सत्काराऐवजी त्यांनी आष्टीतील दोन जिल्हा परिषद शाळांना तब्बल ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

आष्टी येथे सामाजिक कार्यकर्ते गणीभाई तांबोळी यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. आमदार, खासदार आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्याऐवजी त्यांनी दोन जिल्हा परिषद शाळांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.

गणीभाई तांबोळी व मुख्याध्यापिका शमीम तांबोळी यांची कन्या शिरीन आणि वैराग येथील इब्राहिम तांबोळी यांचे चिरंजीव अरबाज तांबोळी यांचा विवाह रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आष्टी येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या विवाह सोहळ्यातील सत्काराचा अनावश्यक खर्च टाळून तो निधी शाळांच्या शैक्षणिक विकासासाठी देण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, आष्टी यांना २१ हजार रुपये, तर जिल्हा परिषद उर्दू शाळा, आष्टी यांना ११ हजार रुपये, अशी एकूण ३२ हजार रुपयांची मदत देण्यात आली. या रकमेचा धनादेश आष्टीचे केंद्रप्रमुख त्र्यंबक दिंडे आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सातपुते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. माजी सभापती रमजान तांबोळी यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन आजीमोद्दीन बागवान आणि पत्रकार निसार शेख उपस्थित होते.

या विवाह सोहळ्यास माजी आमदार साहेबराव (नाना) दरेकर, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमरावजी धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मेहबूबभाई शेख, माजी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सतीश (आबा) शिंदे, ॲड. भाऊसाहेब लटपटे, अमोल तरटे, माजी सभापती नियामत बेग, बाळासाहेब मिसाळ आणि औरंगाबाद खंडपीठाचे ॲड. एन. एल. जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

विवाह सोहळ्यातील सत्कारापेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश गणीभाई तांबोळी यांनी आपल्या कृतीतून दिला. त्यांच्या या उपक्रमाचे बीड जिल्ह्यासह परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *