यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात भारतीय संविधान दिन विविध शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक प्रशांत महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. धीरज चौधरी आणि ॲड. मयूर सुरडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची माहिती दिली. तसेच संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व सोप्या व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले.
संविधान हे केवळ पुस्तक नसून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनाचा आधार आहे. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणून जबाबदार आणि सुजाण नागरिक बनावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती मिळण्यासोबतच लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण झाली.
अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत होईल, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शेवटी अध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
