जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथे लाखो रुपये खर्च करून बसवलेली एक्वा मशीन नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दोन वर्षांपूर्वी दहिगाव ग्रामपंचायतीमार्फत सहा ते सात लाख रुपये खर्च करून प्रमुख चौकातील पाण्याच्या टाकीजवळ एक्वा मशीन बसवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच मशीन नादुरुस्त झाली. मशीनमधून पाणी घेणारे ग्रामस्थ देणगी म्हणून पैसे टाकत होते. या पैशांच्या विल्हेवाटीबाबतही काही कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्या शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांना खासगी विक्रेत्यांकडून २० रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज असून, प्रशासकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन एक्वा मशीन तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *