जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात ऐतिहासिक निंबाळकर किल्ल्याचा दर्शनी भाग कोसळल्यानंतर किल्ल्यालगत राहणाऱ्या १३० कुटुंबांना नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
यावल शहरातील न्यायालयाजवळ असलेल्या ऐतिहासिक निंबाळकर किल्ल्याचा दर्शनी भाग गुरुवारी पहाटे कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्यालगत राहणाऱ्या १३० कुटुंबांना नगरपालिका प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
या नागरिकांचे गेल्या ५० वर्षांपासून येथे वास्तव्य असून, ते नियमित कर भरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि जागा मिळेपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, आमदार अमोल जावळे, प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार मोहनमाला नागरीकर आणि भाजपा कार्यकर्त्यांनी शनिवारी किल्ला व वस्तीची पाहणी केली. तसेच नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते का, याचीही पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
आता या १३० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासन कसा मार्गी लावणार, याकडे यावलकरांचे लक्ष लागले आहे.
