खा.ओमराजे निंबाळकर यांचा म.प्रा.अधिकारी व ठेकेदारांना अल्टीमेटम
(सचिन बिद्री:उमरगा)
महामार्गाचे काम चालू झाल्याने मध्यरात्रीपासुन जिल्ह्यातील दोन्ही टोलनाके चालू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि .२४ रोजी उमरगा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शेकडो प्रवाशांचा बळी घेणाऱ्या महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत व मागील आठ वर्षापासून बंद असलेली कामे येत्या सहा महिन्यात पूर्ण केली जाणार असल्याचे आश्वासन संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्याने टोल वसुली सुरू करण्यास येत असली तरी येत्या तीन महिन्यात ५० %काम पुर्ण न झाल्यास पुन्हा टोल बंद करू ,अशी तंबी खा . निंबाळकर यांनी उमरगा येथील पत्रकार परिषदेत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी प्रकल्प संचालक पी .डी. चिटणीस ,प्रकल्प अधिकारी मनोज कुमार, श्री .धर्मेंद्र, ठाकरे गटाचे नेते बाबा पाटील, दीपक जवळगे, सुरेश वाले, बाबुराव शहापुरे, सुधाकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे महामार्गाचे काम 2014 सली सुरू झाले होते . सदरील काम एस पी पी एल कंपनीने 2016 पर्यन्त पूर्ण करणे अपेक्षित होते .आठ वर्ष उलटूनही या महामार्गाचे काम अपूर्ण आहे .या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताची संख्या वाढतच आहे. टोल पूर्णतः बंद असतानाच्या काळात अनेक वेळा काम सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी केली होती काही ठिकाणी काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. जवळपास आत्तापर्यंत पाच कोटी रुपये टोल वसुली बुडाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी काम सुरू ठेवून टोल चालू करण्याची मागणी केली होती .
याबाबत अधिकाऱ्यांनी येत्या सहा महिन्यात 11 जुलै 2023 पूर्वी उड्डानपुला सहीत रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने ही टोल वसुली मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येत आहे. काही ठिकाणी काम निकृष्ट होत असलं तरी याचा तोटा संबंधित कंपनीलाच होणार आहे.2039 पर्यंत या रस्त्याच्या कामाची सुधारणा कंपनीलाच करावी लागणार आहे अशी माहिती खासदार ओमराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बलसुर मोड ,जकेकूरवाडी व अन्य ठीकाणच्या उड्डाणपूल बाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, डांबरीकरणाचे निकृष्ट काम पुन्हा करावे. त्रिकोळी रोडसह अनेक ठिकाणी दिशादर्शक बसवणे बाबत पंधरा दिवसात युद्धापातळीवर कारण्याबाबत आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले .शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारीचे पाणी तुंबत असल्याने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याकडे योग्य पाठपुरावा करू अशीही ग्वाही खा.निंबाळकर यांनी दिली .
————–
बैठकीत या मुद्द्यावर चर्चा
⚫ दरमहा कामाच्या प्रगती बाबत आढावा बैठक घेणार .
⚫तीन महिन्यात 50 टक्के काम पूर्ण न झाल्यास पुन्हा टोल बंद करणार .
⚫तालुक्यातील अनेक ठिकाणी महामार्गवरील 15 दिवसांत खचलेला रस्ता दुरुस्त करणार .
⚫बलसुर ,जकेकुरवाडी व अन्य ठिकाणच्या भुयारी मार्ग, ओव्हर ब्रिजसाठी पाठपुरावा करणार .
⚫️शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजुच्या गटारीच्या कामाबाबत नगरपालिका व महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढणार
⚫️महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनावर भर देणार.
⚫️महामार्गावर आवश्यक ठिकाणी 15 दिवसांत दिशादर्शक फलक त्वरित बसवले जाणार.