वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा
‘वयोश्री’ आणि दिव्यांगांसाठीच्या ‘एडिप’ या दोन्ही योजनांखाली गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांत पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. परंतु सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांची त्यांनी यासंदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ज्येष्ठ नागरीकांना सहाय्यभूत साधने पुरविण्यासाठी राबविण्यात येणारी वयोश्री आणि दिव्यांगांसाठीच्या 'एडीप' या दोन्ही योजनांचे बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय उत्तम काम झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा जवळपास एक लाख जणांची तपासणी पूर्ण झाली आहे.
या दोन्ही योजनांखाली वितरीत करण्यात येणाऱ्या सहाय्यभूत साधनांचे आता वाटप करायचे मात्र त्यासाठी निधीच नसल्याचे सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांची भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सहाय्यभूत साधनांचे त्वरीत वाटप करणे शक्य होईल अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ही भेट सकारात्मक झाली असून लवकरच निधी उपलब्ध होईल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे