पुणे : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त श्री.क्षेत्र तुळापूर ( ता.हवेली ) येथे ग्रामपंचायत तुळापूर, समस्त ग्रामस्थ तुळापूर व धर्मवीर संभाजीराजे विद्यालय श्री क्षेत्र तुळापूर आणि मायभूमी स्पंदन फाउंडेशन, पुणे आयोजित छत्रपती श्री शिव शंभुराजे काव्य आदरांजली या प्रथमच घेण्यात आलेल्या काव्य संमेलनात निमंत्रित कवींसह बालकवींनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या काव्यातून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना काव्य आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री क्षेत्र तुळापूरच्या सरपंच अॅड. गुंफाताई इंगळे व उपसरपंच राजाराम शिवले यांनी शंभूराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व स्मृतीस्थळाला अभिवादन करून केली. किशोर बालभारतीचे माजी संपादक प्रसिद्ध साहित्यिक माधव राजगुरू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते.
डॉ.गंगाधर रासगे यांनी शंभूराजेच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पोवाडा यावेळी सादर केला. त्यावेळी सर्व शंभू भक्त मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. यावेळी घेण्यात आलेल्या बालकवी संमेलनात बालचमुंनी लयबद्ध प्रकारे सुंदर रंगात आणि ढंगात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. फक्त काव्य वाचन नव्हे, तर मर्दानी खेळ आणि पोवाड्याचेही या बालदस्तांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाला उपस्थित शंभू भक्तांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली. बालचमुंच्या त्या कविता ऐकून निमंत्रित कवींनीही त्यांची तोंड भरून कौतुक केले.
यावेळी कवी शिवाजीराव चाळक, रूपालीताई अवचरे, अस्मिता जोगदंड -चांदणे, आनंद डोळस, गोपाल पठारे, मयूर करंजे, मनोहर परदेशी, शहाजी वाघमारे, वैशाली शिंदे, विक्रम कोर्डे, शेखर फराटे,प्रा.विजय अंधारे,रामदास शेळके,बबन धुमाळ, प्रसन्नकुमार धुमाळ,बाबासाहेब जाधव,अंजना कंद,विकास आतकरी, संतोष घुले, धनंजय सलगर, बाबा जाधव, प्रसन्नकुमार धुमाळ, बबन शिंदे, तेजस्विनी रुके, आनंद जगताप आणि प्रा. कुंडलिक कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायभूमी स्पंदन फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गुंजाळ, धर्मवीर संभाजीराजे विद्यालयाचे मुख्याध्यापक व समन्वयक, आबा जाधव व ग्रामपंचायत तुळापूर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.युवा साहित्यिक सचिन बेंडभर व प्रसिद्ध कवी संदीप वाघोले यांनी कार्यक्रमाचे सुत्रस़ंचलन केले. मायभूमी स्पंदन फाऊ़ंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
