औरंगाबाद
भारतरत्न तथा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून समाजकल्याणाची (सोशल वेलफेअर) ची संकल्पना जनतेच्या मनात रुजवली. तसेच, ही संकल्पना कटाक्षाने राबवावी, ही अपेक्षा बाबासाहेबांनी सत्ताधाऱ्यांकडून बाळगली. तथापि, ही संकल्पना हद्दपार करण्याचे प्रयत्न सध्याच्या सत्तांधाऱ्यांकडून सुरु आहे. असे प्रखड मत बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी व्यवस्थापक पी.बी.अंभोरे यांनी शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे पुरस्कार वितरण सोहळयात बोलतांना केले.
निळे प्रतिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात औरंगाबाद येथे सदरील पुरस्कार वितरण सोहळा लोककवि वामनदादा कर्डक व शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परतूरचे जेष्ठ साहित्यिक प्रा.छबुराव भांडवलकर यांनी भूषविले.
या वेळी माधवराव बोर्डे यांच्या पत्नी तथा संत कबिर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विठाबाई माधवराव बोर्डे, आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष, श्रावणदादा गायकवाड, अधिक्षक अभियंता एस. एस.भगत, सामाजिक कार्यकर्त्या तिलोत्तमा झाडे, उद्योजक दुष्यंत आठवले, भास्कर भोजने, रतनकुमार साळवें यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात पी.बी. अंभोरे पुढे म्हणाले की, समाजकल्याण हे भारतीय संविधानाचे प्रमुख अंग आहे. या संविधानाचा ढाचा न बदलता त्यातील प्राण काढून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. सरकार कोणाचे हे महत्वाचे नाही, पण संविधानावर घाव घातले जात आहे. हे मात्र सहन करण्यासारखे नाही. सध्याच्या सरकारकडून सुरु असलेले खाजगीकरणाचे प्रयत्न हे सोशल वेल्फेअर या संकल्पनेशी विसंगत आहे. असे प्रयत्न सर्वांसाठी घातक आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येवू पाहत आहे. लोकशाहीवर आघात होत आहे. हे सध्याच्या वास्तव आहे. या परिस्थितीत आपण जागल्याचे काम केले तरच लोककवि वामनदादा कर्डक व शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे यांची संयुक्त जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एस. एस. भगत म्हणाले की, वामनदादा हे कवि व शाहीर होते. त्यांनी गरीब कुटूंबात जन्म घेतला. वामनदादांनी लहानपणी कष्ट केले.वाचणे, लिहीणे जमत नाही, याची त्यांना खंत होती. नंतर ते कवि म्हणून जगासमोर आले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील त्यांनी योगदान दिले. त्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला. त्यांची भाषा ही सामान्य जतनेची भाषा होती. वामनदादा हे कवि सुरेश भट्ट यांच्या आधीचे गजलकार होते. याची आपण दखल घेतली पाहिजे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी देखील गीत लिहीले होते.सामाजिक कार्यकर्त्या तिरुत्तमा झाडे यांचेही भाषण झाले. त्या म्हणाल्या की, मी औरंगाबाद मधील मणिपूर हिंसाचार विरोधी रॅलीत सहभागी झाले होते.
तेथे मी माझ्या भावना व्यक्त केल्या. ते पाहूनच निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे यांनी मला आपल्या कार्यक्रमात बोलण्याची विनंती केली. त्यानुसार मी या कार्यक्रमात सहभागी झाले. वामनदादा विषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, वामनदादांची गिते घराघरात पोहोचली आहे, वामनदादांची महत्ती ऐकून माझ्या डोळयात पाणी आले. वामनदादा हे चिंतनशिल कवि होते, असा गौरव तिरुत्तमा झाडे यांनी केला. सध्याची पत्रकारिता लाचार होत आहे. दिवसेंदिवस स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. पण हे जरी खरी असले तरी त्यावर मात करण्याची ताकद आंबेडकरी विचारांमध्येच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिध्द उद्योजक दुष्यत आठवल म्हणाले की, नोकऱ्या बंद झाल्या आहेत, त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे.
मी काहीच करु शकलो नाही, अशी खंत कधीही, कोणीही व्यक्त करु नये. प्रत्येकाने आशावादी राहिले पाहिजे.
असे आवाहन त्यांनी केले.संत कबिर शिक्षण संस्थेचे अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे यांनी आपल्या भाषणात आपली कौटुंबिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. आपला संसार किती अपूरा होता, अनेक अडचणींना आपण सामोरे गेलो, पण कधी खेद व्यक्त केला नाही.कधी मन हलके केले नाही. आजकालच्या महिलांनी काटकसर केली पाहिजे. पुर्वीच्या महिला काटकसर करत होत्या. काटकसर करण्याचा मलाही अनुभव आहे. माधवराव बोडें यांच्या सहवासाने आम्ही प्रगतीची झेप घेतली. शिक्षणकार्यात आमच्या परिवाराला योगदान देता आले. हे आमचे सद्भाग आहे,अशी भावना विठाबाई बोर्डे यांनी व्यक्त केली.
आंबेडकरवादी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, संविधान कोणीही बदलू शकणार नाही. देश बायबल अथवा गितेमुळे चालत नाही, तर देश संविधानामुळे चालतो. या संविधानात अनेक चांगली मुलभूत तत्वे आहेत.हे संविधान सामाजिक न्यायाशी निगडीत आहे. त्यामुळे संविधान आम्ही बदलू देणार नाही. आणि बदलण्याविषयी भिती बाळगण्याचे काहीच कारण नाही.शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्याही कार्याचा गौरव केला. माधवरावांनी दानपारमिता जपली. त्यांनी अनेकांना दान दिले.त्यांच्या दानामुळेच आंबेडकरी चळवळीला बळ मिळाले आहे. परिवर्तन केवळ भाषण केल्यानेच होत नाही तर त्यासाठी दानशूर पुढे आले पाहिजे. आपण आपल्या उत्पन्नातील २०% हिस्सा चळवळीसाठी दिला पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. भोजने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संविधान बदलणार नाही, असे अनेक जण सांगतात, पण या भ्रमात राहून चालणार नाही.
कारण,आपल्यापैकी प्रत्येकाने क्रांती व प्रतिक्रांतीचा अभ्यास केला पाहिजे. याअभ्यासामुळे मनातले भ्रम दूर होतात. आजचा काळ हा आणिबाणीचा आहे. याकडे
लक्ष वेधून भोजने म्हणाले की, आजचा सुशिक्षित वर्ग हा कोशात बंद झाला आहे.
त्यामुळे प्रतिक्रांती सध्या मुजोर झाली आहे, असे होणे धोकादायक आहे. हे धोके
टाळण्यासाठी व आमची पिढी गुलाम होवू नये यासाठी सुशिक्षित वर्गासह प्रत्येकाने
आपल्या कोशातून बाहेर पडले पाहिजे,असे आवाहन केले. निळे प्रतिकचे संपादक
रतनकुमार साळवे यांच्याही कार्याचा त्यांनी गौरव केला.
सामाजिक कार्यकर्ते अंबादासराव रगडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय जनतेला आपल्या जातीबद्दल प्रेम आहे.आपल्या धर्माबद्दल प्रेम आहे.त्यामुळे येथील जनतेला आम्ही स्वातंत्र्य बहाल करणार नाही. असा इशारा ब्रिटीशांनी दिला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संविधान लिहील्या गेले आणि त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. संविधान नसते तर आपण सर्वजण असुरक्षित राहीलो असतो. सर्व धर्म समभाव हेच देशाचे कवचकुंडल आहे, याकडेही रगडे यांनी लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निळे प्रतिक बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्ड यांच्या आठवणी व्यक्त केल्या. आपल्या प्रास्ताविक भाषणात निळे प्रतिकची वाटचाल स्पष्ट करतांना साळवे म्हणाले की, माधवराव बोर्डे यांनी मदत केल्यानेच निळे प्रतिक मोठे झाले आहे. एवढी मोठी दानशूर व्यक्ती माझ्या पाठीशी उभी राहिली, हे मला विसरता येणार नाही. आजचा पुरस्कार वितरण सोहळा हा सामाजिक बांधिलकीचा भाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना जेष्ठ साहित्यिक छबुराव भांडवलकर म्हणाले की, कवि, साहित्यिक हे समाजाला मार्गदर्शन करीत असतात. कवि व साहित्यिक हे परिवर्तनवादी चळवळीला बळ देत असतात. महाकवि वामनदादा कर्डक यांनी देखील आंबेडकरी चळवळीला बळ देणारी हजारो गिते लिहीली. या गितांमुळे आंबेडकरवादी चळवळीला व जनतेला आत्मभान आले. खरे म्हणजे, चळवळी जिवंत ठेवण्यासाठी कवि व साहित्यिकांची गरज असते. त्या दृष्टीने वामनदादांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात माधवराव बोर्डे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या दानशूर वृत्तींमुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना व चळवळीला बळ प्राप्त झाले,
हे ही विसरुन चालणार नाही, अशा शब्दात भांडवलकर यांनी माधवराव बोर्डे यांचा गौरव केला.
या कार्यक्रमास शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे यांचे सुपुत्र अॕड.राहुल बोर्डे, डॉ.चंद्रकांत थोरात, प्रा.डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ. यशवंत खडसे, प्रा. भारत सिरसाट, सुदाम मगर, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे, जगन्नाथ सुपेकर, प्रा.भगवान धांडे, गं. हं राठोड, स. सो खंडाळकर, व्ही. के.वाघ, अँड. डी. व्ही खिल्लारे, प्रा.डॉ. प्रज्ञा साळवे, ॲड. जयश्री भगत,अंबादास रगडे, रशपालशिंग अट्टल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील २० जणांना शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक साळवे, शारदा पगारे, सोनाली जोहरे, विद्या साळवे,जया गजभिये, हिराबाई खरात, सुमित पवार, संकेत साळवे, जितेंद्र भवरे, गजानन इंगळे, वैशाली गवई, बाबुराव गवई, सुधाकर निसर्गन यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक साळवे यांनी मानले.
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद