मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अमंलबजावनी बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा
धाराशिव : महायुती सरकारचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे .या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांनी आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र / रहिवासी दाखला, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, हमीपत्र इत्यादी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे . रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये घेतले जात आहेत . ई-सेवा केंद्र व इतर दलालामार्फत महिलांची आर्थिक लूट केली जात आहे तसेच ही योजना मंजूर करून देण्यासाठी काही दलाल अधिकचे पैसे घेत आहेत.ही लूट थांबवण्यात यावी तसेच कमीत कमी त्रास व खर्चात सर्व महिलांना अनुदान उपलब्ध करून द्यावे.तसेच ग्रामपंचायत ,ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत फॉर्म व कागदपत्रे स्वीकारण्यात यावेत व हे स्वीकारण्यात आलेले फॉर्म प्रशासनामार्फत नंतर ऑनलाईन करण्यात यावे जेणेकरून महिलांची आर्थिक पिळवणूक थांबेल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांची उपविभागीय कार्यालयात दि .२ रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली केली आहे .
. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न २.५ लक्ष रू. पेक्षा कमी असणाऱ्या २१ ते ६० या वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रू. मानधन देण्यात येणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांनी सदर योजनेसाठी १ जुलै ते १५ जुलै २०२४ या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. सदर प्रकियेदरम्यान कोणत्याही महिला भगिनींना अडचण येणार नाही याबाबत प्रशासनाने सतर्क रहावे व जास्तीत जास्त महिलांना सदरील अनुदान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी केली आहे.