काही पोचट स्वयंघोषीत नेते पाहत आहेत आमदारकीचे दिवास्वप्न..


वाशिम:-विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो. इच्छुकांचे मात्र सध्या ‘अच्छे दिन’ आहेत. श्रेष्ठींनी अनेकांना काम करा, पाहू या असा मेसेज दिल्याने इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून स्वत:चे अस्तित्व पणाला लावून आहेत.
वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात अनेकांना आमदार व्हायचंय. तुम्ही म्हणाल नेमके इच्छुक कोण? गुडघ्याला बाशिंग बांधलेले कोण? कर्तव्यदक्ष कोण? अपेक्षा ठेवून असणारे किती? असा शोध घेतल्यानंतर आता अधिकाधिक स्वयंघोषीत नेते,इतर पक्षात चादरी ऊचलणारे कार्यकर्ते यांना बहुदा आमदार व्हायचंय दिसून येतेय.अनेक इच्छूक आमदारकीच्या टिकीटासाठी पक्षश्रेष्ठीकडे पायघड्या घालतांना दिसत आहे.सोबत जंञी घेवुन चहापाणी पाजुन ‘माझ्यामागे खुप’ हा आव दाखवण्याचा काहींचा प्रयत्न सुरु असलेला दिसत आहे.आता मुद्दा हा आहे की पक्ष तिकीट किती जणांना देणार? तिकीट मागणाऱ्यांची ही जंत्री केवळ भाजपातच नाही तर काँग्रेस,राष्टवादी, शिवसेनेसह वंचित पक्षातही आहे.आपणही तिकीट मागितले तर हरकत काय? असे म्हणून आपल्या नावाचा श्रेष्ठींच्या दरबारात गाजावाजा सुरू केला आहे. निवडून येण्याची तशी प्रत्येकालाच शंभर टक्के शाश्वती असते. हाच विश्वास मनात धरून मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाच्या इच्छुकांना निदान ‘लाटे’चा तरी आधार मिळेल पण, इतरांचे काय? अशीही भीती दुसरीकडे या इच्छुकांच्या मनात आहे.खासदारकीत ही लाट ओसरलेली पाहावयास मिळाली परंतु अजुनही काहींना तसा विश्वास वाटतो.त्यातही काहींनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केलाय तर काहींनी इच्छा असूनही आमदारांची नाराजी नको म्हणून उमेदवारीसाठी दावा करण्याचे टाळले आहे.इच्छुकांची संख्या अमाप आहे.आचारसंहिता लागायची आहे. इच्छुकांच्या मनात धाकधूक आहे. पण, नेत्यांशी असलेली जवळीक पाहता अनेकांना सध्यातरी आमदार झाल्यासारखं वाटतंय. तसे ‘मायक्रो प्लानिंग’ इच्छुक करताना दिसत आहेत.

रोजंदारीने व चहापाण्याचा खर्च करुन जमवलेल्या कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह भेटीगाठी सुरु
काही नेते कार्यकर्त्यांना खर्चपाणी करुन त्यांना सोबत घेवुन गावागावात भेटीगाठी घेणे सुरु केले.विविध बैठका तसेच पक्षश्रेष्ठीकडे चकराही मारतांना दिसत आहेत.काही नेत्यांना आता पाच-दहा टवाळखोर एकत्र जमवून राजकीय आखाड्यात आपला मनसुबा सिद्ध करण्याचे वेध लागलेले आहे मात्र राजकारणातील समिकरणे आणि कार्यकर्त्यांचा फौजफाटा नसतांनाही केवळ स्टंट करण्यासाठीच हा मनसुबा असल्याचा दावा आता कार्यकर्त्यांकडून बोलला जात आहे.अनेकांनी विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमविण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे. मात्र त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांची उणीव असतांना आमदार होण्याची स्वप्ने आता विधानसभा निवडणुकीच्या राजकीय मैदानात अनेकांना पडू लागल्यामुळे राजकारणाचाच हा पोरखेळ झाला की, काय? असा सवालही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

आमदारकीच्या रेसमध्ये महीलाही…..

आमदारकीचे स्वप्न पाहणार्‍यामध्ये महिलाही दिसत आहेत.छोटेमोठे कार्यक्रम घेतले म्हणजे आपण खुपच लोकप्रीय झालो असे काही महिलांना वाटत असल्याने आमदारकीत नशीब आजमावयाचे असे काहींचे ठरले असल्याचे चिञ आहे.मंगरुळपीर तालुक्यातील कित्येक गावात आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना लोक साधे ओळखतही नसतांना केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर हा राजकीय स्टंट आखून प्रयोग करणे कितपत योग्य ठरणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा न्यायनिवाडा होणार असला तरी विधानसभा निवडणुकीसाठी सध्या अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र राजकीय मैदानात सद्यस्थितीत दिसून येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206