रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहे. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ७ लाख ८ हजार महिलांचे अर्ज आले होते. या अर्जाची पडताळणी करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनूसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकानिहाय वॉर रुम तयार केले होते.


त्या माध्यमातून ६ लाख ९२ हजार महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले. तीन दिवसांपूर्वी अचानक यातील १ लाख २१ हजार महिलांचे बँके खाते बंद अथवा आधार लिंक नसल्याचे समोर आले. त्यानंतर १५ आणि १६ ऑगस्टला यातील जवळपास सर्व महिलांशी संपर्क साधून यातील ७० ते ८० टक्के महिलांचे बँक खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. अद्याप २५ ते ३० हजार महिलांचे खाते ऑनलाइन लिंक होणे बाकी असून ३१ ऑगस्टपर्यंत ते लिंक झाल्यास संबंधित महिलांच्या खात्यावर योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचे पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.