उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ समाजाच्या बैठकीत एकमताने निर्णय
लातूर : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण अंमलबजावणी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करा, या मागणीसाठी सोमवार (दि.९) पासून लातूर येथे धनगर समाजाचे मल्हारयोद्धा अनिल गोयकर, चंद्रकांत हजारे आमरण उपोषण आंदोलन सुरू करत आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. उपोषणस्थळी शुक्रवारी समाजाची महत्त्वाची बैठक होऊन आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय समाजाच्यावतीने घेण्यात आला.
धनगर एसटी आरक्षणाची मागणी घेऊन उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत लातूर जिल्ह्यातील ‘सकल धनगर समाज’ रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आंदोलक मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर, अशोक अभंगे, सोमनाथ बनसूडे, रमेश लहाडे, सुभाष मुसळे, विष्णू पाटील, बालाजी सुरवसे, सचिन शिवलकर, गणेश उबाळे, सचिन मुकडे सुशील होळकर, अभिमन्यू माने, सुग्रीव शेवाळे, हरिभाऊ काळे, बालाजी होळकर, विठ्ठल शेवाळे, ओम गडदे, रघुनाथ बेडदे, शिवाजी साळुंखे, मच्छिन्द्र भदाडे, राजेश काळे यांच्यासह मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
राज्यातील धनगर समाज मागील ७० वर्षांपासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे, उपोषणे, साखळी उपोषण, आमरण उपोषणे, रास्तारोको, मुंडन आंदोलने, निवेदने, सभा, रेल रोको आंदोलने झाली. तरीसुद्धा सर्वच सत्ताधारी पक्ष्यांनी धनगर समाजाची फसवणूक केल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.