वाशिम/पुणे:-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी मोटिवेशनल पद्धतीने लिहिलेले लेखक जगदीश ओहोळ यांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशन गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, कामगार नेते महादेव वाघमारे व लेखक जगदीश ओहोळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना विचारवंत सुरेश खोपडे म्हणाले की, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आजच्या तरुणाईने लक्षात घेतला पाहिजे. शिकून त्यांनी नवसाहित्य निर्मितीकडे वळले पाहिजे. त्यातीलच महत्त्वाचे काम लेखक जगदीश ओहोळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ ही साहित्यकृती निर्माण करून केलेले आहे. पुढच्या पिढीसाठी हा ग्रंथ खूप महत्त्वाचा व दिशादर्शक ठरणार आहे.
यावेळी बोलताना आरोग्यदूत मंगेश चिवटे म्हणाले की, करमाळ्यासारखे ग्रामीण भागातून आलेला एक तरुण ते आज एक यशस्वी लेखक व महाराष्ट्रातील प्रमुख व्याख्याता ही जगदीश ओहोळ यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेली ओळख आजच्या तरुणाईला आदर्शवत आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झाले ही सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे.
सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी या देशातील स्त्रियांना शिक्षणाचा मूलमंत्र दिला. आणि आज त्याच भूमीमध्ये, फुलेवाडा येथे जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या मान्यवरांचा क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती पुरस्काराने सन्मान होत आहे. ही काम करणाऱ्या माणसांना ऊर्जा देणारी गोष्ट आहे. तसेच चळवळीमध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना ‘बापमाणूस’ पुरस्कार दिल्याने त्यांच्या काम करण्याच्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे. लेखन व्याख्यान व अशा कार्यक्रमांचे आयोजन करून वक्ते व लेखक जगदीश ओहोळ हे चळवळ गतिमान करण्याचे काम करत आहेत.

राज्यस्तरीय क्रांतीसुर्य-क्रांतीज्योती व बापमाणूस पुरस्कारांचे वितरण
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज मान्यवरांचा क्रांतीज्योती – क्रांतीसुर्य व बापमाणूस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली होती. तसेच यावेळी कार्यक्रमाला वाचक श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
‘त्या’ व्हायरल कचरावेचक तरुणीला ‘बापमाणूस विशेष वाचक’ पुरस्कार व रोख मदत
पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जग बदलणारा बापमाणूस पुस्तक खरेदीसाठी गेलेली व ते वाचताना क्लिक झालेला फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर सबंध जगभर त्या फोटोमुळे चर्चा झालेली तरुणी प्रीती मोहिते हिस जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ‘विशेष वाचक’ म्हणून रोख रकमेसह पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनीही या तरुणीला पुस्तकं खरेदी व वाचनासाठी सहकार्य म्हणून पाच हजार रुपयांची रोख मदत दिली.