▪️पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला विषय
लातूर, दि. २८ : जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीचे १२ लाख ८४ हजार १७० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. हे उद्दिष्ट पूर्ण होवूनही काही नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक असल्याने लातूर जिल्ह्याला आणखी २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी १२ लाख ८४ हजार १७० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. जिल्ह्यात १ लाख १५ हजार ३९७ शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ४९३ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी घेवून येण्याचे मेसेज पाठविण्यात आले. २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२ लाख ८४ हजार १७२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. हमीभावाने सोयाबीन खरेदीचे जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने सोयाबीन खरेदीचे पोर्टल बंद झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी बंद झाली होती.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शिल्लक असल्याने जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढवून सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याबाबत जिल्हा पणन अधिकारी यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्याला आणखी २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. तसेच सोयाबीन खरेदीचे पोर्टलही पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आहे.
पालकमत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडली सोयाबीनच्या खरेदीचा मागणी
लातूर जिल्ह्यातील हमीभावाने सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ही खरेदी बंद झाली होती. उद्दिष्ट वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी करण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडली होती.