कत्तलखान्यावरुन उमरग्यात झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे आमदार, पोलिस प्रशासन व नगर परिषदेला निवेदन.
उमरगा:प्रतिनिधी
शहरात नगरपालिकेचा अधिकृत कत्तलखाना नाही, त्यामूळे पिढ्यानपिढ्या जनावरांची कत्तल करुन, मांसविक्री करुन उदरनिर्वाह भागवणारे खाटीक लोक आपापल्यापरिने आपले कत्तलखाने चालवतात. काही लोक घरातूनच कत्तलखाने चालवतात. या कत्तलखान्यांतून काही आक्षेपार्ह गोष्टी घडतात असा संशय घेवून काही लोकांनी तक्रारी केल्या. काही लोकांनी कायदा हातात घेत थेट अशा खाटकांच्या घरात जावून व्हिडिओ करण्याचे प्रकार केल्याचीही वार्ता आहे. या सगळ्या प्रकारांमूळे उमरगा शहरात दि.२७ रोजी (सोमवार) रात्रीच्या वेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.खरं तर उमरगा परिसर हा सामाजिक सौहार्द जपणारा भाग म्हणून सर्वदूर परिचित आहे. या भागातून एका मुस्लिम व्यक्तीला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिल्याचा इतिहासही आहे. अशा परिस्थितीत काही ठराविक लोकांमूळे आजवरच्या सामाजिक सौहार्दाला धक्का लागू नये. तसेच खाटीक लोकांची जनावरे कापून मांसविक्रय करुन उदरनिर्वाह करण्याची पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे. त्यांच्या या उदरनिर्वाहाच्या अधिकाराला कायदेशीर नियमिततेत बसवण्यासाठी नगरपरिषदेद्वारा अधिकृत कत्तलखाना, त्याठिकाणी कत्तल केल्या जाणाऱ्या जनावरांची तपासणी करणारा डॉक्टर, खाटीक व्यवसाय करणाऱ्यांना परवाने इत्यादी बाबींची उपलब्धता करुन दिली जावी.कायद्याने कत्तल करण्याची मान्यता असणाऱ्या जनावरांचे मांस खावून आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची गरज भागवणे हा श्रमिक मांसाहारी लोकांचा अधिकार आहे. जनावरांचे मांस हा त्यांना स्वस्तात आणि मुबलक प्रथिने मिळवून देणारा स्त्रोत आहे. शिवाय हा काही लोकांच्या खाद्यसंस्कृतीचाही भाग आहे. कायद्याने कत्तल करण्यची परवानगी असणाऱ्या जनावरांचा मांस खाणाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे. चुकीच्या पद्धतीने, कायदा हातात घेवून, अल्पसंख्यांक समाजातील घटकांचा पिढ्यानपिढ्यांचा उदरनिर्वाहाचा अधिकार बळकावण्याऐवजी त्याचे कायद्यानुसार नियमितीकरण करुन घेवून, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवून देवून समाजात अकारण निर्माण होत असलेले तणाव दूर करावेत अशा मागण्यांचे निवेदन ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. प्रविण स्वामी, उमरगा पोलिस स्टेशन आणि उमरगा नगर परिषदेस देण्यात आले.

या निवेदनावर ऍड शितल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, ज्योती माने, यशोदा पवार, किशोर बसगुंडे, धानय्या स्वामी, जाहेद मुल्ला, नदीम मुजावर, निसार औटी, अकबर उभापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.